Chandrapur Tiger Death | चंद्रपूर वनविभागात खळबळ: सिंदेवाही तालुक्यात १५ वर्षांच्या वाघाचा मृतदेह आढळला
चंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील सरांडी गावालगतच्या जंगलात 15 ते 16 वर्षांच्या एका नर जातीच्या वाघाचा मृतदेह आज (दि. 24) दुपारी साडेबाराच्या सुमारास आढळून आला. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेतला असून चंद्रपूर येथील पीटीसी सेंटरला हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. एका भल्या मोठ्या वाघाचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभागामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रातील रत्नापूर बिटात सरांडी गावालगत जंगलात काही नागरिकांना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास वाघाचा मृतदेह कंपार्टमेंट नंबर 45/609 मध्ये दिसून आला. लगेच या बाबतची माहिती नवगाव येथील उपवनक्षेत्र कार्याल्याला देण्यात आली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाला माहिती दिली.
सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी अंजली भोरीवार, क्षेत्रसहायक एस. बी. उसेंडी आदी दीडच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. वनाधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणात घटनास्थळी वाघाचा मृत्यू झालेला होता. 15 ते 16 वयाचा नर जातीचा वाघ आहे. वाघाचे सर्व अवयव शाबुत आहेत. ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक राकेश शेपट यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सदर घटनास्थळाची व वाघाच्या मृतदेहाची पहाणी केली. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही.